अयोध्या प्रकरणी सुनावणी नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता

0
265

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सुनावणी सुरु असताना त्याचवेळी मध्यस्थता करण्याचे प्रयत्न सुरु ठेवण्यास काही हरकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सागितले आहे. यासोबतच सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गनोगोई यांनी डेडलाइन दिली आहे. रंजन गोगोई यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गरज लागल्यास एक तास अतिरिक्त तसेच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले असल्या कारणाने, देशातील अत्यंत संवेदनशील विषय मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय येण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच गरज असेल तर शनिवारीही सुनावणी करु शकतो असे सुचवले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले आहे की, “१८ ऑक्टोबरपर्यंत पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला पाहिजे जेणेकरुन निर्णय घेतला जाऊ शकतो”. “आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी पत्रे मिळाली आहेत. हे प्रयत्न सुनावणी सुरु असतानाही करण्यात आमची काही हरकत नाही,” असेही त्यांनी सांगितले आहे.