Maharashtra

अयोध्या दौरा आटोपून उद्धव ठाकरे मुंबईत दाखल

By PCB Author

November 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अयोध्या दौरा आटोपून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज (रविवार)  सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईत आगमन झाले. फैजाबाद विमानतळावरून ते विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

मुंबई विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर मोठ्या संख्येने  शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरे येताच शिवसैनिकांनी जोरात घोषणाबाजी केली. अनेक शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह मातोश्री निवासस्थानी रवाना झाले.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. अयोध्येत शिवसेनेने पहिले राजकीय पाऊल टाकले आहे. अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उदघाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच अयोध्या येथे शिवसेना सदस्य नोंदणीची सुरुवात होणार आहे.