Pune

अमोल कोल्हे, चंद्रकांत पाटील यांच्या नावे खंडणी मागणारा ‘तो’ भामटा कोण…

By PCB Author

January 28, 2021

पुणे, दि.२८ (पीसीबी) : खासदार अमोल कोल्हे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अरुण शेंडगे अस या भामट्याचे नाव असून त्याला मदत करणाऱ्या सुरेश बंडू कांबळे या त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे विशाल शेंडगे हा मागील काही महिन्यांपासून ‘मी चंद्रकांतदादा बोलतोय’ असं म्हणत पुणे आणि परिसरातील बांधकाम व्यवसायिकांना फोन करायचा आणि त्यांना पैशांसाठी धमकवायचा. ही बाब उघडकीस आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती.

विशाल शेंडगे याच्याविरुद्ध पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दोन तर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये एक असे एकूण तीन गुन्हे नोंद करुन त्याला अटक देखील करण्यात आली होती. या गुन्ह्यातून जामीनावर सुटताच आरोपी विशाल शेंडगेने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने बांधकाम व्यवसायिकांना फोन करुन पैशांसाठी धमकवायला सुरुवात केली.

वानवडी भागातील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने ‘मी अमोल कोल्हे बोलतोय’ असं म्हणत पैशांची मागणी केली होती. खासदार कोल्हे यांना हे समजताच त्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर पुन्हा एकदा विशाल शेंडगेला पुण्यातील वानवडी पोलिसांनी अटक केली. विशाल शेंडगे यांनी आणखी कोणत्या नेत्यांच्या नावे खंडणी उकळण्याचा प्रकार केलाय का याचा पोलिस तपास करत आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या नावे पिंपरी चिंचवड शहरातील एका मोठ्या हॉस्पिटल व्यवस्थापकाकडे २५ लाखाच्या खंडणीसाठी फोन आला होता. त्याशिवाय महापालिकेच्या काही बड्या ठेकेदारांनाही पाटील यांच्या नावाने खंडणीचे फोन आले होते. आता त्या प्रकऱणात विशाल शेंडगे हाच आहे का याचाही तपास पोलिस करत आहेत.