अमेरिकेत वर्क व्हिसा देण्यावरील बंदी डिसेंबर पर्यंत कायम

0
297

न्युयॉर्क, दि. २३ (पीसीबी) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वर्क व्हिसा देण्यावरील बंदी या वर्षअखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत कायम ठेवलीय. यामुळे अमेरिकेत काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांना वर्ष संपायची वाट पाहावी लागणार आहे.

व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुशल कामगारांसाठीचा H-1B व्हिसा, कंपनीअंतर्गत ट्रान्सफर होणारे L-1 व्हिसा, अकॅडेमिक आणि संशोधकांसाठीचे व्हिसा, तसंच हंगामी कामगारांसाठीचे H-2B व्हिसा यांवर सुधारित निर्णयाचा परिणाम होईल. मात्र, अमेरिकेच्या व्हिसासंबंधी या निर्णयातून अन्न प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्यांना सवलत मिळू शकते. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितंल की, “या निर्णयामुळे कोरोनानंतरच्या काळात अमेरिकेतील नागरिकांना लवकर नोकऱ्या मिळू शकतील. ट्रंपना वाटतंय की, शक्य तेवढ्या लवकर लोकांना आपापल्या नोकरीवर परत आणलं पाहिजे.”

व्हिसासंबंधी या निर्णयामुळे 5 लाख 25 हजार नोकऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी उपलब्ध होतील आणि कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या संकटात दिलासादायक ठरेल, असं डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यालयाला वाटतं. अमेरिकेतील इमिग्रेशन सर्व्हिसमधून मिळालेल्या डेटानुसार भारतातून व्हिसासाठी 3 लाख 9 हजार अर्ज करण्यात आले आहेत. त्या खालोखाल चीन (४७,१७२), कॅनडा (४,६२५), दक्षिण कोरिया (४,४६५), फिलिपाईन्स (३,२५०) असे अर्ज आहेत. असाही अंदाज वर्तवला जातोय की, अमेरिकेत जे परदेशी नागरिक राहतात, त्यांच्या कायमच्या वास्तव्याच्या सुविधेवर तातडीनं प्रतिबंध लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून केली जाऊ शकते. परदेशातून कुणी अमेरिकेत येऊ नये, असाच एकूण प्रयत्न डोनाल्ड ट्रंप यांचा दिसून येतोय.

दरम्यान, अमेरिकेतील ज्या कंपन्या पूर्णपणे परदेशातील कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यांनी मात्र व्हिसासंबंधीच्या या निर्णयाचा विरोध केलाय.