अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आज शपथ घेणार

0
339

वॉशिंगटन, दि. २० (पीसीबी) – अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या आज (20 जानेवारी) शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. सोबतच उपाध्यक्षपदी असणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्ती असतील. दरम्यान, देशवासियांना अभिमानाची बाब म्हणजे भारतीय वंशाचे २० मान्यवर अमेरिकेचे गावकारभारी सणार आहेत.

यापूर्वी दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नव्हती आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.

कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या. त्यानंतर कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत.