अमेरिकेचा पाकिस्तानला दणका; २१०० कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली

0
653

वॉशिंग्टन, दि. २ (पीसीबी) –  दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल पाकिस्तानची अमेरिकेने ३०० मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे २१०० कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली आहे. जोपर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत तुमची आर्थिक नाकेबंदी केली जाईल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे.  

दहशतवादाविरोधात कारवाई न केल्यामुळे आम्ही तुमची आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या पैशाचा वापर इतर कामांसाठी केला जाईल असे, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरूवातीलाही अमेरिकेने पाकिस्तानची ५० कोटी डॉलरची आर्थिक मदत रोखली होती.

दरम्यान, पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारत, अफगाणिस्तान आणि इराणबरोबरही शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशाराही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता.