Videsh

अमेरिका आणि चीनचे युद्ध होण्याची शक्यता

By PCB Author

October 07, 2021

वॉशिंग्टन, दि. ७ (पीसीबी) : अमेरिेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिका आणि चीनचे युद्ध होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला. अमेरिकेत सध्या सगळ्यात कमकुवत आणि भ्रष्ट सरकार असल्यामुळे चीन अमेरिकेचा सन्मान करत नाही. त्यातूनच हे युद्ध होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन प्रशासनावर टीका केली आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही वर्षांपासून तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांची स्विर्त्झलँडमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीआधीच ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर टीका करताना म्हटले की, निवडणुकीत गैरप्रकार करण्यात आल्यामुळे अमेरिकेत कमकुवत आणि भ्रष्ट नेतृत्व सत्तेत आहे. अमेरिकेला चीनसोबतच्या युद्धाचा सामना करावा लागू शकतो असेही ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिेकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार आणि करोनाच्या मुद्यावर संबंध ताणले गेले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना संसर्गासाठी चीनला जबाबदार ठरवले होते. चीनने जाणीवपूर्वक हा संसर्ग जगभरात फैलावू दिला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.