Pimpri

अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर शस्त्रक्रिया

By PCB Author

March 08, 2021

पिंपरी, दि. 8 (पीसीबी):पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरले आहे. उपचारासाठी एक रुपयाचाही खर्च न होता गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजारातून मुक्त केले जात असल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत आहेत. रुग्णालयाच्या दंत चिकित्सा विभागात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर ५५ वर्षीय महिलेला जीवदान मिळाले असून एक महिन्यांच्या उपचारानंतर ती आता ठणठणीत बरी झाली आहे.

शाबीरा शेख या (वय ५५) राहणार इंद्रायणी नगर भोसरी येथील महिलेला सहा वर्षांपूर्वी खालच्या जबड्याचा दुर्धर आजार झाला होता. अनेक खाजगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यावर खात्रीशीर उपचार झाला नाही. त्यामुळे जबड्याचे हाड कुजत चालल्याने दाताने अन्न चावतानाही वेदना होऊ लागल्या. शेख याना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. पती सफाई कामगारांचे काम करून कसाबसा उदरनिर्वाह चालवीत होते त्यामुळे मोठा खर्च पेलणे कठीण होऊन बसले होते त्यामुळे हतबल झालेल्या शेख यांचा पतीने चव्हाण रुग्णालयातील दंतचिकित्सा डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला. दंत चिकित्सा करणाऱ्या डॉ.यशवंत इंगळे यांनी जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात शेख यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून खालच्या जबड्याची कुजलेली हाडे काढून घेतली व टायटेनियम धातूच्या पट्टीचे रोपण केले. त्यानंतर रुग्णालयात एक महिना उपचार केले.शेख सध्या ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नाही. असा आजार दर दहा लाखात १.७ टक्के लोकांमध्ये आढळतो आणि हा आजार स्थानिकदृष्ट्या घातक असल्याने जबड्याचे हाड कुजत जाते.

त्यामुळे दुर्मिळ आजारावर कोणताही खर्च न होता यशस्वी उपचार झाल्याने शेख यांनी समाधान व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले.  ही शस्त्रक्रिया चव्हाण रुग्णालयाचे दंत चिकित्सा विभाग प्रमुख डॉ.यशवंत इंगळे यांच्या समवेत डॉ .दीपक पाटील, डॉ.श्रीनिवास, डॉ.अजिंक्य,डॉ.श्रद्धा म्हस्के यांनी सहकार्य केले. यासाठी डॉ.तुषार पाटील पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.