अमित शहानी घेतले संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन

0
642

पुणे, दि. ८ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. शनिवारी पालखीच्या पुण्यातील आगमनानंतर नानापेठेतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम होता. या ठिकाणी अमित शहा, रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांचे आज (रविवारी) दुपारी पुण्यात आगमन झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

शहा शहरातील काही मान्यवरांच्याही भेटी घेणार आहेत. पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत बाबासाहेब पुरंदरे यांना भेटणार आहेत.  मात्र, “आर्य चाणक्य” या विषयावरील शहांच्या व्याख्यानासह ते कोणाला भेटणार आणि त्याला काही राजकीय संदर्भ असेल का याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शहांचा पुणे दौरा चर्चेचा ठरला आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शहा पुण्यात आले आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील तीन हजार लोकांना निमंत्रित केले आहे.