Maharashtra

अमित शहांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर मातोश्रीवर !   

By PCB Author

February 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (दि.५) मातोश्रीवर भेट घेतली. युती होण्यासाठीच त्यांना मातोश्रीवर पाठवले होते, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

तर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्याकडे शिवसेनेच्या प्रचाराची  रणनिती आखण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजप-शिवसेनेची युती होण्यासाठी अमित शहा आग्रही आहेत.  त्यामुळेच शहांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पाठवल्याचे समजते.

शिवसेनेचे  संघटनात्मक जाळे चांगले आहे. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे नियोजन नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांची निवडणूक सल्लागार कंपनी ‘पीके’ची मदत घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.    किशोर हे चतुर  असून  त्यांचे व्यावहारीक ज्ञान उत्तम आहे. त्यामुळे त्यांचा शिवसेनेला कितपत फायदा होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.