अमित शहांचा तीन तासांचा मुंबई दौरा; राजकीय चर्चांना उधाण

946

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मंगळवारी (दि.१६) तीन तासांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत गुप्त बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत नेमके काय घडले, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शहा यांचा दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.  

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शहा यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. त्यांनतर विलेपार्ले येथील बैठक संपवून अमित शहा रात्री आठ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या चर्चा झाल्याची राजकीय अंदाज बांधले जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती.

दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ मुंबईत करणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण देशाच्या विविध भागात करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी शहा यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे.