Maharashtra

अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

By PCB Author

June 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणावे,  अशी जोरकस मागणी मनसेच्या नेत्यांनी बैठकीत केली. मनसेच्या नेत्यांच्या आणि सरचिटणीसांच्या बैठकीत बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी केली. तसेच मराठीच्या मुद्यावर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

आपल्यातच मराठीचा मुद्दा रूजलेला नाही, असे बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. तसेच नाशिकमधील कामांचे आपण मार्केटिंग करण्यात कमी पडलो, असे सांगून कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाट न पाहता पक्षासाठी काम करावे, असे ते म्हणाले. मनसेची नवी स्ट्रॅटेजी बनवून पुन्हा कमबॅक करण्यावरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, अमित ठाकरे अद्यापही राजकारणापासून दूर राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फारसे सक्रीय नाहीत. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.