Maharashtra

अमिताभ बच्चन यांनी खास मराठीत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

By PCB Author

July 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठ्ठलनामाचा गजर होत आहे. पहाटेपासून लोकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत. आषाढी एकादशी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आज सकाळीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नीक वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईची पूजा केली. अनेक कलाकारांनी देखील आषाढीच्या खास शुभेच्छा सोशल मिडियावर दिल्या आहेत. अभिनयाचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील खास मराठीत ट्विट करून सगळ्यांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, तुमच्या परिवाराला अनेक अनेक शुभेच्छा. विठ्ठल- रखुमाईची कृपा आपण सर्वांवर सदैव राहू दे हीच प्रार्थना’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच काही अभंगाच्या ओळीदेखील त्यांनी लिहिल्या आहेत.