Desh

अमर, अकबर अँथनी पायात पाय घालून पडतील, दानवेंचा महाविकास आघाडीला टोला

By PCB Author

July 21, 2020

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर, अँथनीचं, सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे, असंही दानवे म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, “महाराष्ट्रात अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते एकमेकांच्या पायात पाय घालून आपोआपच पडेल. राम मंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार की नाही? दरम्यान राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार की नाही?  याबाबत सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा दिली होती. निवडणुकीपूर्वी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. मात्र विरोधकांनी आता उध्दव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांची परवानगी घ्यावी लागत असल्याचा आरोप केला आहे.

निमंत्रणासाठी प्रताप सरनाईकांचं पत्र दरम्यान, राम मंदिर भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्टला होणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करा असं पत्र, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राम जन्मभूमी ट्रस्टला लिहिलं आहे.