‘अमरावती बंद’ मध्ये सहभागी झालेल्या ‘त्या’ भाजप नेत्यांना अटक

0
416

अमरावती, दि.१५ (पीसीबी) : ‘अमरावतीत बंद’मध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या काही नेत्यांना पोलिसांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. अनेक नेत्यांना त्यांच्या राहत्या घरामधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरातील साईनगर कॉलनीतील गणेशविहार येथील राहत्या घरातून केली अटक पोलीस तुषार भारतीय यांना घेऊन सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचेही समजते. तुषार भारती यांच्याबरोबरच माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे.

भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी काही भाजपा नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.

१२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कलम १४४ लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील. अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. या प्रकरणात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटक करण्यात आलीय.