Maharashtra

“अमरावतीत येऊन पुन्हा दंगल भडकवायची आहे का?”: किरीट सोमय्यांना यशोमती ठाकूर यांचा सवाल

By PCB Author

November 16, 2021

अमरावती, दि.१६ (पीसीबी) : शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीसाठी कोण जबाबदारी आहे, यासंबंधीचे आरोप-प्रत्यारोप अनेक दिवसांपासून सुरु आहेत. हिंसक कारवायांसाठी अमरावतीच्या पोलिसांनी काल अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली. तसेच भाजप नेत्यांनीच ही दंगल घडवून आणल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अमरावती दौऱ्याचं सूतोवाच केलं आहे. मात्र किरीट सोमय्या यांना अमरावतीत येऊन पुन्हा दंगल भडकवायची आहे का, असा सवाल अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्या अमरावती दौऱ्यावर येण्याचं सूतोवाच केल्याच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या यांनी अजून 15 दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान किरीट सोमय्या यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना अमरावती दौरा पुढे ढकलला असल्याचं सांगितलं. अमरावती पोलिसांनी फोन करून मला हा दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी अमरावती दौरा रद्द केला असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजानं बंदचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावानं दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी भाजपने बंद चं आवाहन केलं होतं. या दिवशीही मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरून त्यांनीदेखील हिंसक कारवाया केल्या. तेव्हापासून अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता असून चार ते पाच हजार पोलीस सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आहेत. अमरावतीत दंगा नियंत्रक पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. काल सोमवारी दंगा भडकवण्याप्रकरणी भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केली आणि सोडून दिले. अल्पसंख्याक मंत्री यांनी या दंगलींसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे तर भाजप नेत्यांनी या दंगलीमागे मलिकच आहेत, असा प्रत्यारोप केला आहे.