“अमरावतीत वातावरण शांत झालं असताना कुणी काड्या करण्याचं काम करु नये”: शिवसेना नेत्याची फडणवीसांना ताकीद

0
313

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : ‘हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही’, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. ‘विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, अशी ताकीद संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत म्हणाले कि, ‘इंटेलिजन्स फेल होतं, ती देखील माणसं आहेत, काश्मीरमध्ये फेल होतं, त्रिपुरात होतं. राज्य सरकारनं अमरावतीमधील परिस्थिती आटोक्यात आणली. आज अमरावती शांतता नांदत आहे.भाजप कशासाठी आंदोलन करतंय त्यांना पुन्हा अमरावती पेटवायची आहे का? कशा करता आंदोलन करताय, जे काही होईल ते कायद्यानं होईल. महागाईवर भाजप आंदोलन करतंय का? चीन लडाखमध्ये घुसलंय म्हणून आंदोलन करताय का? इंटेलिजन्स गाझीपूर बॉर्डरवर फेल होतं. अरुणाचल प्रदेशात इंटेलिजलन्स फेल होतं. माणसं आहेत चुका होतात.’

‘राज्याचं सरकार सक्षम आहे. भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे एका बाजूवर गुन्हा दाखल होतो, असं म्हटलं जातं. ज्यांनी अमरावती पेटवली,ज्यांनी अमरावतीचं नुकसान केलं त्यांना सोडलं जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणताही एक गट नाही. ते दंगेखोर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलीय. यासंबंधी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात बंदी का घातली नाही, असं संजय राऊत म्हणाले. रझा अकादमीवर बंदी घालण्याबाबत गृहमंत्री,कॅबिनेट आणि मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थेची परंपरा चांगली राहिलेली आहे. इथं चेहरा पाहून कारवाई होत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि भाजपनं अमरावतीची परिस्थिती शांत करण्यासाठी आक्रमकता दाखवावी’, असं संजय राऊत म्हणाले