Desh

अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे तूर्तास स्थगित

By PCB Author

June 28, 2018

श्रीनगर, दि२८ (पीसीबी) – ‘बम बम भोले’च्या जयघोषात अमरनाथ यात्रेसाठी निघालेला भाविकांचा दुसरा जथ्था जम्मूमध्ये दाखल झाला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

अमरनाथ यात्रेला काल म्हणजेच बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या जथ्थ्यामध्ये ३३० महिला आणि ३० लहान मुंलांसह १९०४ भाविकांचा समावेश आहे. यात्रेकरुंचा पहिला जथ्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. मात्र जोरदार पावसामुळे यात्रा स्थगित करण्यात आली.

अमरनाथ यात्रा पुढील ६० दिवस चालणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यातच सुट्ट्यांमुळे श्रीनगरमधील पर्यंटकांमध्ये वाढ झाली आहे. श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

२५ हजार सीआरपीएफ जवान, १५ हजार जम्मू आणि काश्मिर पोलिस भाविकांच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यंदा पहिल्यांदाच मोटारसायकल स्क्वॉडद्वारे सुरक्षा देण्यात आली आहे.