Banner News

अभ्यासक्रम प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळणार; यूजीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

By PCB Author

October 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – विद्यार्थांना कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी एकत्र संपूर्ण अभ्यासक्रमाची फी जमा करण्यातून सवलत देण्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या किमान १५ दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण फी संबंधित संस्थेला विद्यार्थ्याला परत करावी लागणार आहे. यासंदर्भात वि्दयापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रसिध्द केले आहे. यानिर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यूजीसीने शैक्षणिक प्रवेशासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, यापुढे  शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे  जमा करण्याची आवश्यकता  नाही. जर पडताळणीसाठी कागदपत्रे गरजेची असल्यास तात्काळ त्यांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. कोणतीही कागदपत्र शैक्षणिक संस्था पडताळणीसाठी यापुढे आपल्याकडे जमा करुन घेऊ शकणार नाही. यात  गुणपत्रक,   लिव्हिंग सर्टिफिकेट्स याचा समावेश आहे.

शैक्षणिक संस्थांना एका वेळी संपूर्ण अभ्यासक्रमाची फी घेता येणार नाही.  नव्या नियमावलीनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेला एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्याचेही आदेशही यूजीसीने दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या किमान १५ दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण फी परत करावी लागणार आहे.

अनेक संस्था प्रवेश रद्द केल्यास फी देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. या निर्णयामुळे विद्यार्थांचे नुकसान होणार नाही. तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या ३० दिवसांमध्येही ठराविक रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेला ५ टक्के किंवा ५ हजार  रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रवेश रद्द करतानाचा दंड म्हणून वसूल करता येणार नाही.