Maharashtra

अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी साताऱ्यातून माघार घेतली; मोदींचा शरद पवारांना टोला   

By PCB Author

October 17, 2019

सातारा, दि. १७ (पीसीबी) – साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज येथून माघार घ्यावी लागली आहे, असा टोला पंतप्रधान  मोदी यांनी काँग्रेसला लगावला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशाही त्यांनी टीका आज (गुरूवार) येथे केली.

लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की,  साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे ते सांगतात. मात्र, येथून  शरद पवारांनीही उभे राहण्याचे टाळले. कारण हवेची दिशा त्यांना चांगली समजते. ते राजकारणातील मोठे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवायला विरोध केला.  ही बाब खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनीच एका मुलाखतीत सांगितल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

भाजपकडे शिवाजी महाराजांचे केवळ संस्कार होते, आता त्यांचे कुटुंबीयही आमच्यासोबत  आले आहे. गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने केंद्रातही आणि राज्यातही शिवाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे काम केले. सत्ता आल्यास सातारा जिल्ह्याला देशातील  पहिल्या १५ पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.