अभिमानास्पद: सख्या तिघी बहिणी झाल्या पोलीस

0
1579

शेलुबाजार, दि. २१ (पीसीबी) – मंगरूळपीर तालुक्‍यातील शेलुबाजार येथील एकाच घरातील तिघी सख्या बहिणींची पोलीस दलात नियुक्ती झाल्याने त्यांच्या घरच्यांना सुखद धक्का बसला आहे.

श्रध्दा वाघमारे, भाग्यश्री वाघमारे आणि प्रिया वाघमारे असे पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत झालेल्या तिघा सख्या बहिणींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्‍यातील शेलुबाजार येथून जवळच असलेल्या तऱ्हाळा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या नारायण वाघमारे यांच्या तीन मुली श्रध्दा, भाग्यश्री आणि प्रिया या तिघीही आज तऱ्हाळा येथे पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेल्या आहेत. मुलींच्या जन्माने खचून न जाता त्यांनी तीनही मुलींना चांगल्या संस्कारासोबतच शिक्षणाकडे लक्ष दिले. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट सतत त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे या तीनही बहिणींनी जिद्द व चिकाटीमुळे शिक्षण आणि त्यानंतर पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या तीनही बहिणी आज महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देत आहेत.