अभिनेत्री प्रिया वारियर विरोधातील गुन्हा रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

0
683

दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) –  दाक्षिणात्य चित्रपटातील ‘मणिक्य मलयारा पूवी’ या गाण्यामुळे गोत्यात आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवार) दिलासा दिला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेत्री आणि निर्मात्यांविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

‘ओरू अदार लव्ह’ या दाक्षिणात्य चित्रपटातील‘मणिक्य मलयारा पूवी’ या गाण्यातील नेत्रअदा आणि भ्रूलीलामुळे प्रिया प्रकाश सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्ध झाली होती. मात्र, या गाण्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मुस्लीम संघटनांनी तिच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी धार्मिक दुखावल्याप्रकरणी प्रिया प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती.

आज या याचिकेवर सुनावणी देत असताना सुप्रीम कोर्टाने तेलंगण सरकारला फटकारले आहे. ‘चित्रपटात कोणीतरी गाण गात आणि तुम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करता. तुमच्याकडे दुसरे काम नाही का?’, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने तेलंगण सरकारला फटकारले. अभिनेत्रीने गाण्यादरम्यान डोळा मारल्याने धार्मिक भावना दुखावत नाही. त्यामुळे हा खटलाच उभा राहू शकत नाही, असे सांगत कोर्टाने एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहे.