Maharashtra

अभिनेत्री केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यां चार जणांना अटक

By PCB Author

June 28, 2019

मुंबई, दि, २८ (पीसीबी) – अभिनेत्री केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांपैकी गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादमधून काल एकाला अटक केली आहे. अश्लील आणि शिवीगाळ करून केतकीला ट्रोल करण्यात आले होते. त्या प्रकरणी ट्रोल करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ट्रोल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांच्या आदेशानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली केतकी चितळे हिने सोशल मीडियावर हिंदी भाषेत एक व्हिडीओ अपलोड केला होता. मराठी अभिनेत्री असतानाही हिंदीमध्ये व्हिडिओ अपलोड करणाऱ्या केतकीवर अनेकांनी टिका केली. एक हजारांहून अनेकांनी केतकीला ट्रोल केले. यामध्ये काहींनी अश्लील, शिवीगाळ करत खालच्या स्तरातील भाषा वापरली. यामुळे संतापलेल्या केतकीने ट्रोलकऱ्यांना त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले. एक व्हिडिओ पुन्हा अपलोड करून प्रत्येकाचा समाचार घेतला.

गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल (२८ जून) गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश नरोडे (२३) याला २३ जूनला अटक केली होती. या व्यतिरिक्त अक्षय विजय बुराडे ( २५) याला २६ जूनला उल्हासनगरहून, पंकज महादेव पाटील (२६) याला २७ जूनला कोल्हापुरहून आणि निनाद विलास पारकर (२६) याला मुंबईतून अटक केली आहे. या सर्वांवर ३५४/ड , 500, ५०४, ५०६, ५०७, ५०९, ६७ ITI हे कलम लावण्यात आले आहेत.