Maharashtra

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर ?

By PCB Author

September 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – अवघ्या सहा महिन्यात काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  लोकसभा निवडणुकीतील  पराभवानंतर उर्मिला यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 

नुकताच उर्मिला मातोंडकरने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पक्षांतर्गत राजकारणात  माझा  वापर झाल्याची भावना  त्यांनी व्यक्त केली होती.  त्यावेळी पक्षांतराबाबत उर्मिलाने मौन बाळगले होते. मात्र, आठवडाभरानंतर उर्मिला यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेण्यासाठी नार्वेकर यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे. उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत चर्चा झालेली नाही, असा दावा नार्वेकरांनी केला आहे.