अभिनंदनला सोडण्याचा सल्ला तुम्हीच इम्रान खानला दिला ; भाजपचा शरद पवारांना टोला

0
612

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पाकिस्तानच्या ताब्यात असताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिजित वर्धमान यांना सोडण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला होता, असा उपरोधिक टोला भाजपने पवार यांना लगावला आहे.

चाकण येथील सभेमध्ये बोलताना  पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या एअरस्ट्राईकची कारवाई आमच्या सल्ल्यानेच करण्यात आली होती, असा दावा  शरद पवार यांनी केला होता.  हे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी  याबाबत त्यांनी  खुलासा करताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास प्रसारमाध्यमांनी केल्याचे पवारांनी म्हटले होते. मात्र,  या वक्तव्यावरुन आता भाजपने पवारांवर ट्विटरवर  व्यंगचित्राच्या माध्यमातून  टोला लगावला आहे.

‘साहेबांच्या माघार पर्वाच्या यशस्वी प्रयोगानंतर सादर होत आहे नवीन प्रयोग ‘सल्ला पर्व”, या कॅप्शन सहीत व्यंगचित्र ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भाजपाने #साहेबांचा_सल्ला #भ्रष्टवादी_काँग्रेस हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. व्यंगचित्रामध्ये शरद पवारांच्या तोंडी ‘नेटफिक्स’वरील ‘सिक्रेड गेम्स’ सिरीजमधील नवाजुद्दीनचा लोकप्रिय ‘कभी कभी लगता है मैं ही भगवान हूं!’ हा संवाद दाखवण्यात आला आहे.  तर खुर्चीवर चेहरा पाडून बसलेल्या पवारांच्या या फोटोमागे पवारांनी इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही सल्ला दिल्याचे रेखाटण्यात आले आहे. ‘अभिनंदनला सोडा असा सल्ला मीच इम्रान खान याला दिला होता.’ आणि ‘किम जोंग उनला भेटून घ्या असा सल्ला मी डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना दिला होता,’ असा दावा पवार करत असल्याचे या व्यंगचित्रात म्हटले आहे.