अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर? ‘मातोश्री’ वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0
485

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जात सदिच्छा भेट घेतली आहे.

कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशा सोबत सत्तारही भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांचा भाजप प्रवेश झाला नसल्याचे दिसून येते.

याच दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सत्तार आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे तब्बल अर्धा तास सत्तार आणि ठाकरे यांची चर्चा रंगली.

सत्तार यांना या संदर्भात विचारले असता, मी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. पुढे विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे सदिच्छा भेट घेणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंशी सविस्तर राजकीय चर्चा झाली. नंतर जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल, असे सत्तार यांनी म्हंटले.