अब्जाधीशांच्या यादीतून अनिल अंबानी बाहेर; संपत्तीत मोठी घट

0
342

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – २००८ साली जगभरात सर्वांत श्रीमतांच्या यादीत सहाव्या स्थानावर असलेले रिलायंस एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आता थेट अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.

अंबानी समूहावरील कर्जाची व्याप्ती वाढतच चालल्याने अनिल अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. मार्च २०१७ मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायंस समूहावर एकूण १.७ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. विविध कर्जांची परतफेड करताना अनिल अंबानी यांनी आपले साम्राज्य गमावले आहे. त्यातच सोमवारी शेअर बाजारातीलच्या व्यवहारांच्या अखेरीस कंपनीच्या बाजार भांडवलात बरीच घट झाल्याने अनिल अंबानी यांनी अब्जाधीश हे बिरूद गमावले. सोमवारच्या व्यवहाराअंती त्यांच्या ६ कंपन्यांचे बाजार भांडवल ९ हजार १९६ कोटींवर स्थिरावले.

२००८ मध्ये ४२ अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अनिल अंबानी यांची संपत्ती आता केवळ ५२.४ कोटी डॉलर अर्थात जवळपास ३ हजार ६५२ कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये त्यांच्या कंपन्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या शेअर मूल्याचाही समावेश आहे. जर या शेअरचे मूल्य काढले तर केवळ ७६५ कोटी रुपये इतकीच संपत्ती त्यांच्याकडे राहते. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या रिलायंस समूहाचे मूल्य ८ हजार कोटी रुपये होते. रिलायंस निप्पॉन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील आपला ४२.८८ टक्के हिस्सा विकल्यानंतर त्यांच्या संपत्तीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी अनिल अंबानी यांच्यासाठी आगामी काळ अजून अडचणीचा ठरु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.