Maharashtra

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्स अध्यक्षांच्या श्रीमुखात भडकावली”; म्हणूनच राज्यकर्त्यांनीही जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी घ्यावी’ : सामना

By PCB Author

June 10, 2021

मुंबई, दि.१० (पीसीबी) : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्याने हे कृत्य केले. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडले त्याचा हाच संदेश आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली आहे. श्रीमुखात हा सभ्य संस्कारातील शब्द आहे. आपल्या भाषेत ‘थप्पड’ लगावली, थोबाड फोडले, कानफट रंगवले असे बरेच काही सांगता येईल. अध्यक्षांच्या कानफटात भडकावणे हा त्या देशाचाच अपमान आहे, पण असे माथेफिरू अनेक देशांत जागोजाग निपजत असतात. तैन-आय हर्मिटेज या छोट्या शहरात मॅक्रॉन एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोहोचले. तेथे जनतेच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एक व्यक्ती पुढे आली. त्याने राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांनाही जुमानले नाही व फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.

फ्रान्स हा लोकशाहीप्रधान देश आहे. संसदीय लोकशाहीस तेथे मोलाचे स्थान आहे. मॅक्रॉन हे निवडणुकीत विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मॅक्रॉन हे कुणाला आवडत नसतील तर त्यांच्यावर टीका होऊ शकते, पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत.

अनेक राज्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले. आपल्याच देशात इंदिरा गांधी, राजीव गांधी, बियांत सिंग, इतकेच काय, जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारख्या सेनानींना भररस्त्यात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले व यापैकी अनेकांना प्राण गमवावे लागले. अलीकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला झाला, पण तो हल्ला पायावर निभावला. महात्मा गांधींची हत्या तर सार्वजनिक ठिकाणीच झाली. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गड्डाफी यांना तर संतप्त लोकांनी भररस्त्यात ठार मारले. अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांनाही माथेफिरूने ठार केले. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही असे माथेफिरू चार पावले पुढेच असतात. त्यामानाने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना फक्त श्रीमुखातच पडली. प्राणावर बेतले नाही, पण गालावर निभावले. पण मॅक्रॉन यांचे गालफट रंगवण्याचे कारण काय? तो माथेफिरू असा का भडकला? त्या माथेफिरूने आधी मॅक्रॉन यांच्या गालावर रंग का चढवला ते समजून घेतले पाहिजे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन दक्षिण पूर्व फ्रान्सच्या द्रोम विभागात विद्यार्थी व इतर लोकांशी संवाद साधत होते. ‘कोविड-19’नंतर जीवनक्रम कसा चालला आहे, हे समजून घेत होते. तेवढ्यात हा माथेफिरू ‘अ बास ला मैक्रों’ अशा फ्रेंच भाषेत घोषणा देत पुढे सरकला. या घोषणेचा अर्थ काय? ‘मॅक्रो मुर्दाबाद!’ तो माथेफिरू भडकला.

कारण ‘कोविड 19’ काळात त्याने सर्वस्व गमावले. त्याने त्याचे आप्तस्वकीय, मित्र परिवारातल्या अनेकांना गमावले. देशाची अर्थव्यवस्था संपल्याने तो आज बेरोजगार झाला. त्याचे जगणे मुश्कील झाले. देशात व्यापक लसीकरणाचाही बोजवारा उडाल्याची ठिणगी त्याच्या मनात उसळली व त्याच ठिणगीचा स्फोट होऊन ती ठिणगी मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच. फ्रान्ससारखेच वातावरण जगातील अनेक देशांत आहे. आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. इथे तर लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे. हरिद्वार, वाराणसी, पाटणा येथील गंगा प्रवाहात या काळात प्रेतांचे तरंगणे व भडकलेल्या सामुदायिक चिता पाहून लोकांच्या मनात संतापाच्या ठिणग्या उडाल्याच असतील. म्हणून लोकांनी देशाच्या, राज्यांच्या सत्ताप्रमुखांच्या श्रीमुखात भडकविण्याचे उपक्रम सुरू केले नाहीत.

फ्रान्स हा हिंदुस्थानप्रमाणेच लोकशाहीवादी देश आहे. आपल्याकडे इतकी लोकशाही रोमारोमांत भिनली आहे की, सारे काही सोसूनही आपल्या देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही. ऑक्सिजनअभावी आप्त स्वकीयांचे डोळ्यासमोर तडफडून होणारे मृत्यूही आपल्या जनतेने निमूटपणे सहन केले. कोविडच्या रुग्णांना बेड मिळो न मिळो, औषधांची, इंजेक्शन्सची टंचाई असो, लसीकरणास कितीही कालावधी लागो, पण आपल्या देशातील सोशिक जनता सरकाराविरुद्ध पेटून कधी माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही. हिंदुस्थानी जनतेची ही सहनशील प्रगल्भता फ्रान्सच्या जनतेमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आता विशेष प्रयत्न करायला हवेत!