…अन्यथा सदनिका सोडतीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही

0
199

पिंपरी, दि. 9 (पीसीबी): केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकृष्ट्या दुर्बल घटांसाठी च-होली, बो-हाडेवाडी व रावेत येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सगणकीय सोडत सोमवार दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी दु. ३.०० वाजता. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.

वस्तुतः या प्रल्पाचे काम सरासरी २० टक्क्यांपर्यंतच झालेले असून, सर्व प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यातच रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असताना सदनिकांची संगणकीय सोडतीची घाई सत्ताधारी भाजप पदाधिकारी का करीत आहेत ? शहरातील गोर गरीब जनतेला आशेला लावून ठेवण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेचे सार्वजनिक निवडणुक एका वर्षावर आली असताना आम्हीच कसे जनतेच्या हिताची कामे करीत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप पक्ष करीत आहे. मागिल चार वर्षे अपवादात्मक एखादा प्रकल्प सोडल्यास एकही नाव घेण्याजोगा प्रकल्प सत्ताधा-यांनी राबविला नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे मागील चार वर्षांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागिल पाच वर्षांत मंजूर केलेले प्रकल्पांची उद्घाटने करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मागील पंचवार्षीक मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना शहरात वेगवेगळे नाविण्यपूर्ण प्रकल्प विकास कामे पूर्ण केली तर काही मंजुर  करून त्यांचे भूमिपूजन करण्यात आली. दरमान्यच्या काळात पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर मागील चार वर्षाच्या काळात शहरातील विकास कामे लांबच परंतु कचरा, आरोग्य, पाणी पुरवठा या पायाभूत सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. मागील काळात राष्ट्रवादीने जी कामे मार्गी लावली होती, ती आता पूर्ण होत आहेत. त्याची उद्घाटने सत्ताधारी भाजप करीत सुटला आहे. ही उद्घाटने करीत असताना स्वतः सुसंस्कृत म्हणविणा-या भाजप पक्षाच्या पदाधिका-यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहराचा ख-या अर्थाने विकास झाला त्यांना या कार्यक्रमास निमंत्रीत करण्याचेही औचित्य दाखवित नाहीत.

खरे तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजशिष्टाचाराप्रमाणे मा. अजितदादा पवार साहेब यांना प्रत्येक विकास कामाचे भूमिपुजन असू दे अथवा उद्घाटन त्यांना निमंत्रीत करून त्यांच्या हस्ते करावयास हवे. परंतु ज्यांचे या शहरासाठी काडीचेही योगदान नाही. पुणे शहराचे पालकमंत्री असताना पिंपरी चिंचवड शहराकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्या चंद्रकांत पाटील साहेब यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. हे केवळ द्वेषाचेच राजकारण करीत आहेत.

ज्या सुसंस्कृत म्हणवणा-या भाजपच्या ठरावीक पदाधिका-यांना राजशिष्टाचार कळतो व विकास कामात राजकाराण कितपत असावे याचे थोडे ज्ञान त्यांच्या बुद्धिमध्ये आहे किमान अशा व मुळ भाजपच्या असणा-या पदाधिका-यांनी तरी पुणे शहरात विधान सभेच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या दोन्हीही व्यक्तींना राजशिष्टाचार लागू होत असल्याने या दोघांच्याही हस्ते विकासकामामध्ये राजकारण नको, म्हणून एकत्र कार्यक्रम केला परंतु, पिंपरी चिंचवडची भाजपा दुस-या पक्षात मन गुंतलेले लोक चालवत असल्यामुळे असे निर्णय ते घेणार की नाही ही शंका आहे. पण पिंपरी चिंचवड शहराला जगाच्या पाठीवर विकासाचे शहर म्हणून ज्यांच्यामुळे ओळख प्राप्त झाली त्या अजितदादांना हे शहरसुद्धा कधीच विसरणार नाही. हे लक्षात असावे तरीही, सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नागरिकांची संगणकीय सोडत काढण्यासाठी आदर सन्मान ठेवावा. दादांना न बोलविण्यामागे डिजिटल पद्धतीचा जास्त उपयोग करणा-या भाजपाने या सोडतीमध्ये गोंधळ करण्याचा डाव असावा अशीसुद्धा शंका माझ्यासारख्याला येते. त्याची दखल पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त घेतील. परंतु आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ही भाजप सत्ताधा-यांची दादागिरी खपवून घेणार नाही. पिंपरी चिंचवड शहरात ज्या–ज्या वेळी मनपाच्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन असतील त्या वेळी राजशिष्टाचाराप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहास्ते घेण्याबाबत आम्ही आग्रही राहू अन्यथा सदर विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही हे सत्ताधारी भाजप पक्षाने लक्षात ठेवावे.

या अनुषंगाने सोमवार दि. ११ जानेवारी रोजी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येण-या नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची सोडत राजशिष्टाचाराप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते काढण्यात यावी अन्यथा सदरचा सदनिकांची संगणकीय सोडतीचा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष होऊ देणार नाही याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.