अन्न भेसळ करणाऱ्यांचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापा – नितीन गडकरी

0
359

नागपूर, दि. २९ (पीसीबी) –  खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर नुसती कायदेशीर कारवाई करू नका. तर त्यांचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून त्यांच्या काळ्या कारनाम्यांना प्रसिद्धी द्या, असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी  दिला. नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या प्रशाकीय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात आज (रविवार) ते बोलत होते.

खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणारे कायद्याला घाबरत नाही. तसेच ते कायद्याचे सन्मानही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करताना त्यांचे कृत्य समाजापर्यंत पोहोचवा. भेसळ करणाऱ्यांची बदनामी करण्याकडे ही अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याचा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या नव्या इमारतीत प्रशस्त आणि अद्यावत अशी प्रयोगशाळा ही तयार केली जाणार आहे. त्यामुळे भेसळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेले नमुने तसेच लोकांनी तपासणीसाठी पाठविलेले नमुने इथे कमी कालावधीत तपासणे शक्य होणार आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यास लगाम बसण्याची अपेक्षा आहे.