अनैतिक संबंध लपवण्यासाठी सख्ख्या बहिणीने केला भावाचा खून

0
3456

सांगली, दि. १८ (पीसीबी) –  तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावात अनैतिक संबंध लपवण्यासाठी सख्ख्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.५ सप्टेंबर) घडली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

रमेश बाळासो झांबरे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तासगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यानुसार मयत तरुणाची बहिण सारिका पाटील (वय ३२, रा. वडगाव) आणि तिचा प्रियकर सुधाकर झांबरे (वय ३८, रा. डोंगरसोनी) या दोघांनाही  अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.७) डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावर रमेश याचा मृतदेह आढळून आला होता. तासगाव पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातील अपघातील निधनाची नोंद केली होती. मात्र गुन्ह्याचा तपास करत असताना मृत रमेश याची बहिण सारिका आणि सुधाकर यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. तासगाव पोलिसांनी सारिका आणि सुधाकर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सुधाकर यानेच खून केल्याचे कबुल केले. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण सारिकाचा भाऊ रमेश याला लागली होती. या कारणावरुन दोघांत वादावादी झाली होती. याबाबत रमेशने सारिकाला समजही दिली होती.

आपल्या प्रेमसंबंधात भावाचा अडथळा होऊ नये व इतरांना याचा सुगावा लागू नये म्हणून सारिका आणि तिचा प्रियकर सुधाकरने रमेशच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या दोन दिवस अगोदर सुधाकर झांबरे रमेशला घेऊन जेवणासाठी धाब्यावर गेला होता. रमेशला दारु पाजली व परत जाताना डोक्यात जड वस्तूचा घाव घातला. डोक्यावर जोरदार घाव बसल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.