Maharashtra

अनैतिक संबंधामुळे अंबाजोगाईतील नगरसवेक विजय जोगदंड यांचा खून

By PCB Author

January 20, 2019

बीड, दि. २० (पीसीबी) – अंबाजोगाई नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विजय जोगदंड यांच्या खूनाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन वर्षापूर्वी त्याचे आणि भावकीतील एका महिलेचे अनैतिक संबंध होते त्यातूनच त्यांचा खून झाल्याचा दावा त्यांचा लहान भाऊ नितीन जोगदंड यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात दिेलेल्या तक्रारीत देखील हे नमुद केले आहे.

नितीन जोगदंड यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नितीन परळी वेस परिसरातील समता नगरमध्ये जाणाऱ्या कमानीजवळ थांबला असताना राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड हे सहा सख्खे भाऊ तलवार, गुप्ती आणि कोयता घेऊन तिथे आले. त्यांनी नितीनला शिवीगाळ करत मालूने नितीनवर गुप्तीने वार केला.

या दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे माहित झाल्याने नगरसेवक विजय जोगदंड यांनी तिथे धाव घेतली आणि हल्लेखोरांची समजूत घालू लागले. त्याचवेळी राज जोगदंडने तलवारीने आणि करण याने कोयत्याने विजय यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विजय जोगदंड गंभीर जखमी झाले. यावेळी नितीनने जीवाच्या भीतीने तिथून पळ काढला. विजय जोगदंड रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीही घटनास्थळाहून पसार झाले. सध्या पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार केली आहेत. तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.