अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा – आशिष देशमुख

251

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्राताली सत्तेचा पेच अद्यापही कायमच आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी जोरदार वेग घेतला आहे. आतापर्यंत दिल्लीत असलेले काँग्रेसचे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या चर्चेनंतर सरकार स्थापनेच्यादृष्टीने अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ‘अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ‘ असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आशिष देशमुख यांनी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला आहे. ते कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात आणि या विषयावर त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. शिवाय आशिष देशमुख काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांचे वडील रणजीत देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती.

राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, जो कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे, तो भाजपाच्या विरोधात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाविरोधात एक विशिष्ट नाराजी पाहायला मिळत आहे. हे पाहता भाजपाला सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, यामध्ये जो एक अनुभवी पक्ष आहे, ज्याकडे चांगले नेते आहेत, असा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा आणि राष्ट्रवादी व शिवसेनेने त्याला पाठिंबा द्यावा, उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावे अशी एक भावना संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे.