Sports

अनुभवी खेळाडूंच्या समावेशाचा होणार फायदा

By PCB Author

December 31, 2020

पुणे, दि. ३० (पीसीबी)  यंदा सईद मुश्ताक अली टी २० स्पर्धेत चांगली कामगिरी करणे हेच उद्दिष्ट असणार असून, संघातील अनुभवी खेळाडूंच्या समावेशाचा फायदाच होईल, असे मत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक संतोष जेधे यांनी मांडले.  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाझ बागवान यांनी या संघाची घोषणा केली. आयपीएलचा तगडा अनुभव असलेल्या राहुल त्रिपाठीकडे महाराष्ट्र संघाचे नेतृ्त्व सोपविण्यात आले आहे. करोनाच्या संकट काळामुळे या वेळी झटपट संपणाऱ्या सामन्यांना बीसीसीआयने पसंती दिली आहे. त्यानुसार मुश्ताक अली टी २० स्पर्धा प्रथम घेण्यात आली. जैव सुरक्षा पद्धतीमुळे या वेळी नेहमीच्या १६ ऐवजी २० खेळाडूंचा संघ निवडण्यात आल्याचे बागवान यांनी सांगितले.

संघ नियोजन आणि रचनेबद्दल प्रशिक्षक संतोष जेधे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,’संघ नक्कीच समतोल आहे. अनुभवी म्हणजे आयपीएल खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असल्याने त्यांचा आम्हाला फायदाच होईल. यंदा स्पर्धा बडोदा येथे होणार असून, गटातील प्रत्येक संघाचा आम्ही अभ्यास करणार आहोत. प्रत्येक सामन्यानुसार आमचे नियोजन असेल.’

करोनाच्या संकट काळात बंद पडलेल्या सरावाच्या पार्श्वभूमीवर संघ निवडीचे आव्हान कसे पेलले या संदर्भात जेधे यांनी संघ निवड ही प्रक्रिया पूर्णपणे निवड समितीची होती आणि त्यांनी आमच्या हातात एकदम योग्य संघ दिला आहे. आता सात आठ महिने कुणीच खेळाडू सरावात नसल्यामुळे एक आव्हानच आमच्यासमोर आहे. पण, प्रत्येक खेळाडू पुरेसे खेळला असल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण येणार नाही. प्रत्येक खेळाडूवर प्रशिक्षक या नात्याने माझा पूर्ण विश्वास आहे, असेही जेधे यांनी सांगितले.

गेल्या मोसमात महाराष्ट्र संघाला चांगली कामगिरी करूनही केवळ निव्वळ धावगतीच्या आधारावर मागे रहावे लागले होते. त्या संघातील ११ खेळाडूंवर अभिजित काळे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विश्वास टाकला आहे. यात राहुल त्रिपाठी, केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड या आयपीएल खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. संघात तरणदीपसिंग (सांगली), वेगवान गोलंदाज धनराज परदेशी, ऑफ स्पिनर सनी पंडीत या तिघांना प्रथमच महाराष्ट्र संघात संधी देण्यात आली आहे. फलंदाजीची आक्रमक शैली असणाऱ्या तरणदीपचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. सराव सामन्यातील कामगिरी पाहूनच खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे.

रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे याला अपेक्षेप्रमाणे या झटपट क्रिकेटसाठी स्थान मिळालेले नाही. कोल्हापूरचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याला गतमोसमातील कुचबिहारा करंडक स्पर्धेतील कामगिरीवर संघात स्थान मिळाले. त्याच्याप्रमाणे स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्याच मधल्या फळीतील फलंदाज रणजित निकमलाही महाराष्ट्र संघाचा दरवाजा उघडला गेला.  महाराष्ट्र संघ – राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख,केदार जाधव, रणजित निकम, अझिम काझी, निखिल नाईक (यष्टिरक्षक), विशांत मोरे (यष्टिरक्षक), सत्यजित बच्छावव, तरणजितसिंग धिल्लॉं, समशुझमा काझी, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिंगणेकर, राजवर्धन हंगरगेकर, जगदिश झोपे, स्वप्निल गुघले, धनराज परदेशी, सनी पंडीत