“अनिल देशमुख म्हणजे महाविकासआघाडीच्या सर्कशीतले जोकर”

0
378

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला आहे. अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणावरुन विरोधकांवर निशाणा साधला असून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देशमुख यांनी बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही म्हटलं. त्यांच्या या टीकेला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा”.

दरम्यान अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर खोटे राजकीय आरोप केले आहे. या खोट्या आरोपांबद्दल भाजपा तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा. भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतंही बेकायदेशीर काम करत नाहीत,” असंही यावेळी अतुल भातखळकर यांनीही म्हटलं आहे. “राज्याने इतके राजकीय गृहमंत्री इतिहासात कधीच पाहिलेले नाहीत,” अशीही टीकाही त्यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं –
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.