Others

अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ; याचिका फेटाळल्यानंतर आता ईडी आणखी एक झटका देण्याच्या तयारीत

By PCB Author

August 17, 2021

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आता तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये चौकशीसाठी याआधी अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी होऊ शकलेली नाही. ईडीकडून पाठवण्यात येणाऱ्या समन्सला अनिल देशमुख यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे ईडीनं न्यायालयात देखील यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.