अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; ईडीनं केली आणखी एक ‘कारवाई’

0
325

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आता खोलात गेला आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर येतेय. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

शिवाय, अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच, अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दिवसभर ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर टीका केली आहे कि, “ही तर सुरुवात आहे. माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज ४ कोटी जप्त झाले आहेत, येत्या काही दिवसांमध्ये ते १०० कोटींपर्यंत जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटक करेल”. असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.