अनिल अंबानींना देश सोडून जाऊ देऊ नका; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

0
562

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – स्वीडनची टेलिकॉम कंपनी इरिक्सन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी दरम्यान सुरू असलेली कायदेशीर लढाई थांबताना दिसत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही अंबानी यांच्या कंपनीने ५५० कोटींची भरपाई दिलेली नाही. त्यामुळे अंबानीसह रिलायन्सच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

इरिक्सनने आरकॉमच्या अखिल भारतीय टेलिकॉम नेटवर्कला ऑपरेट आणि मॅनेज करण्यासाठी २०१४ मध्ये सात वर्षाचा करार केला होता. या करारापोटीचे ५५० कोटी रुपये आरकॉमने इरिक्सनला दिले नाहीत. त्यामुळे इरिक्सनने न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे आरकॉमवर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे.  या आधी ३० सप्टेंबर रोजी कर्ज फेडण्याचे आरकॉमने आश्वासन दिले होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे इरिक्सनने पुन्हा न्यायालयात याचिका सादर केली. त्यात आरकॉम देशातील कायद्यांचे पालन करत नसल्याचे आणि देशातील कायद्यांना गंभीर घेत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय अंबानींना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात यावा. न्यायासह हे प्रकरण संपवण्यासाठीही ते महत्त्वाचे आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

दुसरीकडे आरकॉमने इरिक्सनची भरपाई देण्यासाठी आणखी ६० दिवसांची मुदत मागितली आहे. स्पेक्ट्रमची विक्री पूर्ण न झाल्यानेच त्यांनी ही मुदत वाढवून मागितली आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या  काळात अनिल यांना त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांनी साथ दिली आहे. दोघांमध्ये करार झाला असून त्यानुसार अनिल अंबानी स्पेक्ट्रम, टॉवर, फायबरची विक्री करून २५ हजार कोटी रुपये मिळवणार आहेत. दरम्यान, या डीलमध्ये काही अडथळे निर्माण झाले असून ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.