‘अनाकलनीय’; राज ठाकरेंची भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया  

0
581

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएने दमदार कामगिरी केली. या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनाकलनीय…अशा एका शब्दात निवडणुक निकालांचे  विश्लेषण केले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले नव्हते. मात्र, मोदींच्या विरोधात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आठ ठिकाणी सभा घेत, विरोधाचे वातावरण तयार केले होते. राज यांच्या प्रचारसभांना चांगला प्रतिसाद मिळाला. ए लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत राज यांनी भाजपच्या अनेक योजनांनी पोलखोल केली. मात्र, प्रत्यक्षात राज यांच्या सभांचे पडसाद  मतात उमटले नाहीत.

ज्या ठिकाणी राज ठाकरे यांनी मोदींच्याविरोधात सभा घेतल्या तिकडे युतीचे उमेदवार ही आघाडीवर होते. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांचा यंदाच्या मतमोजणीवर परिणाम झाला नाही. काही महिन्यातच राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये राज ठाकरे कोणती   भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.