Pimpri

अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

By PCB Author

November 08, 2021

पिंपरी, दि.८ (पीसीबी) : चाकण शहरात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमा अंतर्गत (एमआरटीपी अॅक्ट) प्रथमच दोन वेगवेगळे गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. चाकण नगरपरिषदेच्या वतीने या बाबतच्या तक्रारी पोलिसांत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेकायदा प्लॉटिंग मध्ये गुंठा-अर्धा गुंठा जमीन घेऊन बांधकामे करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले आहे.

चाकण पालिकेतील प्रभाग क्रमांक सहाचे बीट निरीक्षक विजय भोसले यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार प्रभाग सहा येथील जमीन गट नंबर 405 मध्ये बेकायदा बांधकाम सुरु असल्याची तक्रार रिझवाना आतार यांनी केली होती. त्यानुसार स्थळपाहणी व पंचनामा केला; संबधित तीन जणांना सदरचे बांधकाम काढून घेण्याच्या नोटीसा दिल्या; मात्र संबंधितानी बांधकाम सुरूच ठेवले. त्यामुळे बेकायदेशीर पणे बांधकाम केल्या प्रकरणी सागर भारती, संभाजी नाझरीकर व सीमा पाटील यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पालिकेचे प्रभाग क्रमांक 23 चे बीट निरीक्षक सुनील साळुंके यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार प्रभाग 23 मधील गट नंबर 1226 मध्ये बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी उस्मान काझी ( रा. माणिक चौक, चाकण ) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण परिसरात जमीन रेखांकनाला बगल देत झालेल्या अनधिकृत प्लॉटिंग मध्ये हजारो घरे उभी राहिली आहेत. अजूनही बांधकामे सुरूच आहेत. यातील नियमितीकरण न झालेली गुंठ्या – अर्ध्या गुंठ्यातील नागरिकांवर बांधकामे करताना गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे ‘पै पै’.. करून कमावलेली आयुष्याची पुंजी गुंठा-अर्धा गुंठा जमीन खरेदीत लावणाऱ्या सामान्य माणसाची फसवणूक होत असल्याची बाब यामुळे चव्हाट्यावर आली आहे.