Pimpri

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

By PCB Author

October 13, 2020

काळेवाडी,दि.13(पीसीबी) : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर संबंधितांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधितांनी बांधकाम काढून न घेतल्याने गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता नितीन रामचंद्र निंबाळकर यांनी दोन्ही प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकरणात कमलाकर बळीराम ढोबळे (रा. मोरया कॉलनी विजयनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ढोबळे यांनी त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे. याबाबत महापालिकेने ढोबळे यांना नोटीस देखील बजावली होती. तरीही ढोबळे यांनी त्यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम काढले नाही.

तर दुस-या प्रकरणात तस्लीनमुन निशा अब्दुल रहेमान खान (रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान यांनी देखील अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांनाही महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र खान यांनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढले नाही.

वरील दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 478 (1), 433 (क) व मुंबई प्रांतिक महानगर पालिका अधिनियम कलम 379 (अ) (1) (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.