अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यालयांना टाळे लावा- उद्धव ठाकरे

0
372

मुंबई, दि. १० (पीसीबी) – अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालले आहे त्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले असून काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत, असे त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटले आहे. या काँग्रेस नेत्यांना जर आपला अध्यक्ष निवडता येत नसेल तर त्यांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरातच बसावे असा सल्लाही उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस ही संघटनाच आता कोसळून गेली आहे. देशासमोर मोठे प्रश्न असताना जनता आशेने विरोधी पक्षांकडे बघत असते. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचीच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षाची आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याबाबतही कोणाला काही वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसची आजची स्थिती म्हणजे त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे मिळालेले फळ आहे.

काँग्रेसचे नेतेच सध्या गांधी परिवाराचा छळ करीत आहेत. घराणेशाहीच्या सावलीतून बाहेर पडावे असे राहुल गांधींनी ठरवले मात्र, त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांना घराणेशाहीच्या सावलीत बसायचे आहे त्यांना उन्हात काम करायचे नाही, अशा शब्दांत टोला लगावताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. पराभवाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिल्याचे म्हणावे तर मग इतका वेळ का लावला? असा बोचरा सवाल त्यांनी देवरा यांना केला आहे.