अथक प्रयत्नांनंतर अखेर ‘त्या’ दरोडेखोरांना अटक

0
189

चाकण, दि.29 (पीसीबी) : सुरक्षा रक्षकांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून आठ जणांनी मिळून कंपनीत दरोडा टाकला. त्यात दरोडेखोरांनी 66 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी त्यातील सात दरोडेखोरांना अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. हा प्रकार रविवारी (दि. 27) पहाटे अडीच ते चार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वासुली येथे द एस एफ ओ टेक्नॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडला.

नवजीवन यादवराव काकड (वय 32, रा. चाकण), रामेश्वर चंपत नाईकवार (वय 37, रा. निघोजे), इंद्रा भोलानाथ पेगो (वय 29, रा. चाकण), रघुनाथ श्रीराम काकड (वय 33, रा. खालूंब्रे), राजकुमार विनायक हुकरे (वय 27, रा. इंदुरी, ता. मावळ), रोशन खुलसिंग राठोड (वय 20, रा. चाकण), दादाराव शिवाजी सावंत (वय 40, रा. इंदुरी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. बिस्वजीत रत्नेश्वर डोले (वय 28, रा. नाणेकरवाडी) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत नितीन आनंदा सावंत (वय 31, रा. शिरोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वासुली येथील द एस एफ ओ टेक्नॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. संदीप अमोगसिद्ध शिवशरन आणि पुरुषोत्तम फुलेर सिंग हे दोघेजण कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपींनी सुरक्षा रक्षक संदीप आणि पुरुषोत्तम यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. त्यामुळे संदीप आणि पुरुषोत्तम चार तास गाढ झोपी गेले.

दरम्यानच्या कालावधीत दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून कंपनीतून 53 लाखाचे 86 केबल रोल, 4 लाख 50 हजारांचे 11 केबल रोल आणि 9 लाखाचा एक केबल रोल असा एकूण 66 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.