Banner News

अत्यंत खळबळजनक…कोरोनाची लस घेऊनही या मंत्री महोदयांना लागण

By PCB Author

December 05, 2020

चंदिगड, दि. ५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लस पुढच्या काही दिवसात उपलब्ध होईल अशी घोषणा केलेली असतानाच आता एक धक्कादायक बातमी आलेली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झालेली आहे. याचाच अर्थ कोरोनाची लस घेतल्यानंतरदेखील त्यांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. अनिल विज यांना 20 नोव्हेंबर रोजी व्यक्तींच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस देण्यात आला होता.

अनिल विज यांनी शनिवारी एक ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहेत. तसेच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी खबरदारी घ्यावी आणि आपल्या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहनदेखील त्यांनी केलेले आहे.

ऑक्टोबर महिन्यात भारताच्या औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी दिली होती. त्यानंतर हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांना गेल्या महिन्यात अंबाला इथल्या हॉस्पिटलमध्ये या लसीचा तिसऱ्या टप्प्यातील पहिला डोस देण्यात आला होता. आयसीएमआरच्या सहकार्याने या लसीची चाचणी देशभरातील सुमारे 26 हजार लोकांवर करण्यात येत आहे. भारतीय लसीची एवढ्या मोठ्या प्रमाणात चाचणी केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण आता अनिल वीज हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या लसीच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झालेली आहे.

दरम्यान हरियाणामध्ये या लसीची जबाबदारी असलेल्या पंडित भगवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ओपी कालरा यांनी या लस्सीबाबत माहिती देताना, या लसीमुळे होणारे धोके अत्यंत कमी आहेत. तसेच आमच्या संशोधनामध्ये लस दिलेल्या एक ते दोन स्वयंसेवकांना हलका ताप आणि ज्या ठिकाणी ही लस दिली आहे ती जागा दुखण्यासारख्या समस्या दिसल्या होत्या. पण यापैकी कोणत्याही स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असा दावादेखील त्यांनी केलेला आहे, असे वृत्त अमर उजाला या दैनिकाने दिले आहे.