Maharashtra

अतुल लोंढेंना अटक केल्याप्रकरणी काँग्रेसचा निषेध

By PCB Author

August 03, 2019

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नागपूरात असलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करणार म्हणून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असे ट्विट  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत  काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे निदर्शने करणार होते. मात्र, त्याआधी  आज (शनिवार)  पहाटे लोंढे यांना पोलिसांनी अटक केली .  जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करणार होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना  ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर थोरात यांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

दरम्यान, लोंढे  म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीला विरोध करू नये म्हणून मला पहाटे अटक करण्यात आली आहे. मी याचा निषेध करतो. लोकांची घरे तोडून रस्ते बांधले आहेत. डंपिंग यार्डमुळे लाखो लोकांना दमा झाला आहे. या अर्धवट कामांना जबाबदार कोण ? असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे.  शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाहीत, बेरोजगारांना रोजगार नाही, मग हा कसला जनादेश? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.