‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून राऊत मुद्दाम आडवे’ – निलेश राणे

0
440

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्यामुळेच संजय राऊत आडवे झाले असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांना काहीही झालेलं नाही. शिवसैनिक फटकावतील आणि अति हुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून ते मुद्दाम आडवे झाले आहेत. ते स्वत: चालत हॉस्पीटलमध्ये गेले आणि काही तासातच सगळी ऑपरेशनही करून झाली. लोकं मूर्ख नाहीत, अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले होते. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसेच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. यापूर्वीही निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती.