Maharashtra

अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली ‘ही’ घोषणा

By PCB Author

October 19, 2020

सोलापूर,दि.१९(पीसीबी) : “पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. “परतीच्या पावसाचं संकट अजून टळलेलं नाही. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी बातचीत केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

“पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. जीवितहानी होऊ नये हे आमचं प्राधान्य आहे. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. पूरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. नुकसानग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी मी आलो आहे. संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पंचनामे सुरु आहे. पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत केली जाईल. कोणीही काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं कारण नाही. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देता आहे. त्यामुळे सावध राहा, प्राणहानी होऊ देऊ नका,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘घाईगडबडीत निर्णय घेणार नाही’ : मुख्यमंत्री “मी आज काही घोषणा केलेली नाही. प्रत्यक्ष माहिती घेऊन जे काही करायचं ते करणार आहोत. पावसाने आगमन केलं तेव्हा निसर्ग वादळाच्या रुपात फटका बसला. मधल्या काळात विदर्भाला फटका बसला आणि परतीचा पावसाने तडाखा दिला आहे. परतीच्या पावसाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. केंद्राकडून मदत मिळेल, असं आश्वासन खुद्द पंतप्रधानांनी फोनवरुन दिलं आहे,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘मुख्यमंत्र्यांना फडवीसांना टोला’ केंद्राची वाट न पाहता राज्याने तातडीने मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीत जावं, मग पंतप्रधानही बाहेर पडतील. नाहीतरी ते बिहारला जातच आहेत. केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नाही.” तसंच या विषयात राजकारण करुन नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. “सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं संकट आहे तर सोबत काम करुन केंद्राची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.