अतिवृष्टीमुळे सोलापुरात २०४ कोटींची पीकहानी

0
634

मुंबई, दि.१६ (पीसीबी)- गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्य़ात दोन लाख ३७ हजार ७०१ शेतकऱ्यांच्या एक लाख ९५ हजार ७३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत २०४ कोटी ९ लाख १५ हजार रुपयांपर्यंत आहे. नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीमध्ये एक लाख ४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचा समावेश आहे. तर ६८ हजार ८६८ हेक्टर क्षेत्रावरील बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. याशिवाय २२ हजार १८४ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचेही नुकसान झाले आहे. या सर्व शेती नुकसानीचे पंचनामे अलीकडेच पूर्ण झाले आहेत. त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये ज्वारी, सोयाबीन, बाजरी, तूर, कांदा, सूर्यफूल, मका यांसह द्राक्षे, डाळिंब आदी फळपिकांचा समावेश आहे.

नुकसान झालेल्या पिकांची किंमत २०४ कोटी ९ लाखांपेक्षा अधिक आहे.यात जिरायत शेतीचे नुकसान ७१ कोटी १८ लाख ६८ हजार, तर बागायती शेतीचे नुकसान ९२ कोटी ९७ लाख २२ हजार एवढी आहे. याशिवाय फळपिकांचे झालेले नुकसान ३९ कोटी ९३ लाखांच्या घरात आहे.

अतिवृष्टीमध्ये ३३ टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकनिहाय माहितीचा तपशील अद्यापि प्रशासनाकडे उपलब्ध झाला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले.