Desh

अणवस्त्र युद्ध होत नाही तो पर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताला मिळणार नाही- सैफुद्दिन सोझ

By PCB Author

June 23, 2018

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अणवस्त्र युद्ध होत नाही तो पर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताला मिळणार नाही असे सोझ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सैफुद्दिन सोझ यांनी काश्मिरींना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतंत्र व्हायला आवडेल हे परवेझ मुशर्रफ यांचे विधान योग्य असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

देशाबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्येही एक पाकिस्तान आहे अशी टिका भाजपाने केली होती. काँग्रेसचे दुसरे नेते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिक जास्त मारेल जातात असे विधान केले होते. सध्या पाकिस्तानच्या ताब्यात काश्मीरचा जो भाग आहे तो भारताचाच भूभाग असल्याची भारताची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे.

सोझ यांच्या वक्तव्याचा संबित पात्रा, अमित मालवीय व रवि शंकर या नेत्यांनी लागलीच समाचार घेतला. “दहशतवादी संस्था लष्कर ए तय्यबा काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांच्या मताशी सहमती दर्शवते तर दुसरे काँग्रेसचे नेते सोझ म्हणतात की काश्मिरींना स्वतंत्र व्हायचे. याचा अर्थ भारताबाहेर एक पाकिस्तान आहे आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे,” संबित पात्रा यांनी ट्विट केले. ज्यांना देशाचे तुकडे करायचेत त्यांना काँग्रेसची साथ असल्याचा आरोप रवि शंकर प्रसाद यांनी केला. विशेष म्हणजे सैफुद्दिन सोझ हे युपीए सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. सोझ यांचे काश्मीर ग्लिम्पसेस ऑफ हिस्टरी अँड स्टोरी ऑफ स्ट्रगल हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. त्यामध्येही अशा प्रकारची मांडणी असण्याची शक्यता आहे.