अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याबाबत काही ठरलेच नाही – नितीन गडकरी

0
384

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देत असाल तरच चर्चा करा असा पुन्हा पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला असतानाही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे’ काही ठरलेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. १३ वी विधानसभा संस्थगित होण्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना, अर्थात शेवटच्या दिवशी देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा प्रस्ताव मान्य नसल्याचेच पुन्हा एकदा सूचित केले आहे. यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्याचेच स्पष्ट झाले आहे. दरम्यान मध्यस्तीची गरज भासल्यास आपण तयार असल्याचेही गडकरी म्हणाले.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याबाबत काही ठरले नसल्याचे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्याचे सरकार बनेल, याचा पुनरुच्चारही गडकरी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड केली असून तेच मुख्यमंत्री बनतील असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसच होणार असे सांगत असताना गरज भासल्यास आपण मध्यस्तीसाठी तयार असल्याचे सांगच गडकरी यांनी राज्यातील भाजप-शिवसेना वाद सोडवण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यातील पेच राज्यातील नेतेच सोडवतील असे सांगत सर्व जबाबदारी राज्यातील नेत्यांच्या खांद्यावर दिली. मात्र तेराव्या विधानसभेची मुदत संपत आली तरी भाजप-शिवसेनेच्या संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. सत्तेचे समसमान वाटप आणि मु्ख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्ष अडून बसल्याने राज्यात सत्ता स्थापनेच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अशात दोन्ही पक्षांमधील वितुष्ट दूर करण्याचा प्रयत्न नितीन गडकरी करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हे लक्षात घेता आज शेवटच्या दिवशी गडकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.